गुरुवार, २४ जुलै, २०१४

समतोल विकासाकरिता धुळे जिल्ह्यात अधिक तालुके निर्माण करणे आवश्यक






     
 महाराष्ट्रात पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी २६ जिल्हे आणि २२९ पंचायत समित्या होत्या.आता राज्यातील सहा महसुली विभागात ३५ जिल्हे,३३ जिल्हा परिषदा आणि ३५१ पंचायत समित्या आहेत.पालघर हा राज्यातला ३६वा जिल्हा असेल.विकासाची गंगा तळागाळातील माणसापर्यंत नेण्यासाठीच जिल्हा किंवा तालुका हा घटक निर्माण करावा लागतो.
   शासनाच्या याच भूमिकेतून रत्नागिरी, धुळे, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद,अकोला,भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे विभाजन करून अनुक्रमे सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, लातूर,वाशीम,गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे करण्यात आले मात्र तेथे जिल्हा परिषदा नाहीत.
   धुळे जिल्हा ८०६३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ व २० लाख ५० हजार ६८२ लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यातील सर्वात कमी म्हणजे केवळ चार (धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर) तालुके असले तरी तो राज्यातील निम्म्या जिल्ह्यांपेक्षा मोठा आहे. म्हणजेच हा धुळे  जिल्ह्याचा   प्रशासकीय अनुशेषच मानावा लागेल.
   राज्यातील धुळे जिल्ह्यापेक्षा तेरा  जिल्हे मोठे असून  त्यांचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) व तेथील तालुक्यांची संख्या अशी :  नासिक (१५५३०) -पंधरा तालुके, जळगाव (११७६५)- पंधरा  तालुके, अहमदनगर (१७०४८ )- चौदा  तालुके, पुणे(१५६४३)-चौदा तालुके, सातारा (१०४८०)- अकरा  तालुके, सोलापूर (१४८९५)- अकरा  तालुके, औरंगाबाद (१०१०७)- नऊ  तालुके, बीड (१०६९३)- अकरा  तालुके, नांदेड (१०५२८)- सोळा तालुके, अमरावती(१२२१०)- चौदा तालुके, यवतमाळ (१३५८२)- सोळा  तालुके, चंद्रपूर (११४४३)-पंधरा  तालुके तसेच गडचिरोली (१४४४१२)- बारा  तालुके.
   धुळे जिल्ह्याच्या (८०६३ चौ.कि.मी.) आकारमानाच्या आसपास असलेल्या पाच जिल्ह्यांचे तालुके पाहा: ठाणे(९५५८)- पंधरा  तालुके, रत्नागिरी (८२०८)- नऊ तालुके, सांगली(८५७२)- दहा तालुके, बुलडाणा(९६६१)- तेरा  तालुके तर  नागपूर(९८०२)-चौदा  तालुके.
   आता धुळे जिल्ह्यापेक्षा लहान असलेले जिल्हे व त्यांचे तालुके यांची संख्याही विचार करायला लावणारी आहे.. ती अशी: रायगड(७१५२)- पंधरा तालुके,सिंधुदुर्ग(५२०६)- आठ तालुके,नंदुरबार(५०३४)- सहा तालुके, कोल्हापूर(७६८५)- बारा तालुके,जालना(७७१८)- आठ तालुके, परभणी(६५१७)- नऊ तालुके, हिंगोली(४५२४)-पाच  तालुके, उस्मानाबाद(७५६९)- आठ तालुके, लातूर(७१५७)- दहा तालुके, अकोला (५४२९)-सात तालुके, वाशीम(५१५३)-सहा तालुके, वर्धा(६३०९)-आठ  तालुके, भंडारा (३८९५)- सात तालुके तसेच  गोंदिया (५४२५)- आठ तालुके. मुंबई जिल्ह्याला तालुके नसले तरी त्याचे क्षेत्रफळ केवळ १५७ चौ.कि.मी. असून मुंबई उपनगर जिल्हा ४४६ चौ.कि.मी. असूनही तेथे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत.

   धुळे जिल्ह्यात याच प्रमाणात तालुके केले तर साक्री तालुक्यात पिंपळनेर (जे इतिहासात जिल्हा मुख्यालय होते ) व निजामपूर ,धुळे तालुक्यात कुसुंबा व शिरूर ,शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा व नरडाणे तसेच शिरपूर तालुक्यात  थाळनेर आणि बोराडी हे तालुके नव्याने निर्माण करता येतील.राजकीय इच्छाशक्ती आणि जनमताचा रेटा यांच्या बळावरच हे शक्य आहे.डॉ.आहेर यांचे देवळा आणि डॉ पतंगराव कदम यांचे पलूस हे नावे तालुके याचे उदाहरण होय.पिंपळनेर तालुका केला तर नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या वेळी तो तिकडे जाण्याची भीती त्यावेळी व्यक्त केली जात होती.बहुतेक सर्व शासकीय योजना तालुका हा घटक समजून दिल्या जातात त्यामुळे त्यांचा सर्वात कमी वाटा धुळे  जिल्ह्याला मिळतो.समतोल विकासाकरिता व प्रभावी प्रशासनासाठी नवे तालुके निर्माण करणे हि काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...